महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
अलिबाग | प्रतिनिधी |
कोकणात एका पाठोपाठ एक आलेल्या अशा निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळात शाळा-अंगणवाड्या तसेच शासकीय इमारतींचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून याबाबत असलेल्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडवून विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारजमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले. तळा, माणगाव, श्रीवर्धन व रोहा या तालुक्यातील विविध विकास कामे व अडीअडचणीबाबत प्रशासकीय भवन, माणगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुंबई म्हाडाचे सभापती शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका आयरे, अनिल नवगणे,प्रमोद घोसाळकर, माजी जि. प.सदस्य ॲड.राजीव साबळे, गजानन अधिकारी, पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी महसूलमंत्री ना. श्री.अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून रायगड जिल्हा परिषदेला 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. अजून रुग्णवाहिकांची गरज असल्यास त्याही उपलब्ध करून दिल्या जातील. ग्रामविकास व महसूल मधील काही रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा भरण्यासाठी मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी याबाबत बैठक घेतली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर काही मंजूर झालेली कामे व राहिलेली कामे अशी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पनवेलच्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रलंबित आहे. ती कामे अंदाजे 14 कोटी रुपयांची होती. त्या खर्चात वाढ झाली असून येत्या आठवड्यात वाढीव निधी मंजूर करून ते कामही लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाच्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अतिशय जाणिवेने काम केले असून अशा अडचणीच्या काळात शासनाने विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. पंचनाम्यानुसार इतर आणखी काही नुकसान झालेले असेल तर त्यासाठीही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येत्या दहा दिवसात निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे सांगून ते पुढे म्हणाले की, या वादळात वैयक्तिक स्वरूपाचे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये खासगी शाळांचाही विचार केला जाईल. मात्र त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. उत्पन्न नसतानाही राज्य शासनाने प्रथम प्राधान्य आरोग्य विभागाच्या बळकटीकरणाला दिले असून चक्रीवादळात गणपती कारखान्यांच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही महसूल राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी शेवटी सांगितले.
या बैठकीस तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्याचे तहसिलदार,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस अधिकारी, महसूल खात्याचे संबंधित अधिकारी,कर्मचारी,माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व खार जमीन तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी अनिकेत घोसाळकर, अजित तार्लेकर तसेच म्हसळा, माणगाव, श्रीवर्धन, तळा, तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक आदि उपस्थित होते.