नवीन क्रीडा संकुलाआधी जिल्हा संकुलाकडे लक्ष द्या; शेकाप नेते पंडित पाटील यांच्या सुचना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरु आहेत. मात्र आधी रायगड जिल्ह्यासाठी असलेल्या अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाकडे क्रीडा राज्यमंत्री असलेल्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लक्ष देऊन जिल्ह्यातील खेळाडूंचा विकास करण्याचा प्रयत्न करावा, अशा सुचना शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.
निवडणूकानंतर कोरोना रुग्णांसाठी कधी विलगीकरण कक्ष तर कधी विलगीकरणातील कच्च्या कैद्यांसाठी कारागृह जिल्हा प्रशासनाच्या अशा निर्णयांमुळे क्रीडा संकुलालाच कोरोना झाला की काय अशी कोपरखळी देखील पंडीत पाटील यांनी लगावली आहे.
नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊन सहा वर्षे पुर्ण झाली तरी त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंचा विकास खुंटला आहे. याकडे पंडित पाटील यांनी लक्ष वेधले.
अलिबाग तालुक्यात नेहुली येथे उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाचे उद्घाटन 7 जुन 2015 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र आज या क्रीडा संकुलाला धड जिल्हा क्रीडा अधिकारी नाही ना इतर कर्मचारी वर्ग तसेच मेंटेनंन्सचादेखील अभाव असल्याने शासन याकडे लक्ष देणार आहे का अशी विचारणा देखील पंडित पाटील यांनी केली आहे. कोकणासाठी माणगावमध्ये नवीन क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र तो उभरण्यापुर्वी जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास करण्याची गरज असल्याचे मत पंडित पाटील यांनी व्यक्त केले. इतर तालुका स्तरावर असलेल्या क्रीडा संकुलाबाबत देखील प्रश्न निर्माण होत असून हे संकुल ठेकेदारांसाठी की खेळाडूंसाठी क्रीडा संकुले हा प्रश्न निर्माण झाला असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली.
लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी संगम येथील जिल्हा क्रीडा संकूल ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा डागडुजी करुन सुरु होते ना होते तोच कोरानासाठी कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आल्याने क्रीडापटूंसाठी दरवाजे बंद झाले. क्रीडा प्रकारांसाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध शिथील होतात न होता तोवर पुन्हा एकदा कच्चा कैद्यांसाठी क्रीडासंकूलमध्ये तात्पुरते जेल उभारण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या क्रीडा संकूलाचे हाल बदत्तर असेच झाले आहेत. एकही विभाग असा राहिलेला नाही ज्याचा क्रीडापटूंसाठी उपयोग होऊ शकेल. जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उपलब्ध होण्यासाठी रायगडकरांना तीस वर्षांची प्रतिक्षा करावी लागली होती. मोठा गाजावाजा करुन उद्धाटन करण्यात आलेल्या या जिल्हा क्रीडा संकूलामुळे खेळाडूंची मात्र अनेकदा निराशाच पदरात पडली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी 1985 साली आलिबाग तालुक्यातील नेहुली येथील 10 एकर जागा संपादित करण्यात आली. त्यानंतर या जागेवर संरक्षण भित बांधण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झाले नव्हते.
2001 सालच्या क्रीडा धोरणानुसर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार हे संकूल अनेक संकटांचा सामना करीत उभे राहीले. संकुलात बॅडिमटन, टेबल टेनिस, फिटनेस सेंटर (जिम) जलतरण तलाव व टेनिस आदींचा समावेश आहे. 10 एकर परिसर असलेल्या या क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल, फिटनेस सेंटर (जिम) बास्केटबॉल कोर्ट व 80 बेडच्या वसतिगृहाची उभारणी तसेच विविध खेळांची मदाने, 400 मीटर धावमार्ग, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट इत्यादी सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र या सगळया गोष्टींचे मेंटेनंन्स नसल्याने त्याची दुरावस्था होत आहे.
गेल्या वर्षी कृषीवलने आवाज उठविल्यावर मेंटेनंन्स सुरु करण्यात आले मात्र तेही तांत्रिक बाबींत अडकून पडल्याने आजही या क्रीडा संकुलाची वाईट अवस्था आहे. त्यामुळे राज्य शासनाने तसेच क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या अदिती तटकरे यांनी त्वरीत जिल्हा क्रीडा संकुलासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करुन जिल्ह्यातील खेळाडूंचा विकास करावा, अशी मागणी पंंडित पाटील यांनी केली आहेत्र