महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाव्दारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते.
गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये, यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पनवेल ते सिंधुदूर्ग मार्ग पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी वरुन होणारी वाळू/ रेती भरलेल्या ट्रकची मोठ्या ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत:-
•दि.08 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि.10 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8.00 वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म. क्र. जुना क्र.17) वर सर्व वाहने ज्यांची वाहनक्षमता १६ टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. यात जड अवजड वाहने, ट्रक मल्टीएक्सल. ट्रेलर इ. वाहने अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. तसेच दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 08.00 वाजल्यापासून ते दि. दि.15 सप्टेंबर 2021 रोजी 8.00 वाजेपर्यंत या कालावधीत तसेच .19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते दि.20 सप्टेंबर 2021 रोजी 8.00 वाजेपर्यंत आणि .08 सप्टेंबर 2021 रोजी रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते दि.20 सप्टेंबर 2021 रोजी 8.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग के 66 वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील. परंतु वरील निर्बंध/बंदी दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण/रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणारी वाहने, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 या महामार्गाचे 2+2 लेनचे बऱ्याच ठिकाणी पूर्ण झालेली कामे व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गाच्या परिस्थितीचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्हयांचे पोलीस अधीक्षक यांनी जड अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथील करण्याबाबत त्यांच्या स्तरावरुन निर्णय घेण्याबाबत शासनाने कळविले आहे. जे.एन.पी.टी. बंदरातून आयात निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील, याकरीता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे, असेही निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.