वाहनचालका त्रस्त, अधिकारी मात्र सुस्त
बोर्लीपंचतन | वार्ताहर |
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी एक ते दोन फूट खोल, तर तीन ते चार फूट रुंदीचे खड्डे पडले असून, काही ठिकाणी तर रस्त्यांची चाळण झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून रस्त्याची ही परिस्थती असून, लाखो रुपये रोड टॅक्स वसूल करणार्या शासनाचे या रस्त्याच्या शोकांतिकेकडे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित अधिकार्यांना मात्र याबाबत काही सोयरसूतक नसून, या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे-माणगाव या महामार्गावर दुतर्फा सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अगदी मंद गतीने चालू असून, काही ठिकाणी हे काम मध्येच अर्धवट तीस ते चाळीस फूट सोडून पुढे पुन्हा कामाला सुरुवात केलेली दिसते. त्यामुळे हा रस्ता होणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
हा रस्ता प्रामुख्याने रायगड जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारा प्रवासी या रस्त्याचा वापर करीत असूनही या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्तीकरण, रस्त्यावरील खड्डे बुजविणे इत्यादी देखभाल दुरुस्तीबाबतीत शासनाची उदासीनता का दिसत आहे? तरी झोपी गेलेल्या शासनाने तातडीने या कामाकडे लक्ष वेधून तातडीने खड्डे बुजवावेत व गतीने रस्त्याचे कामास सुरुवात करावी, अशी वाहन चालक, प्रवासी व पर्यटकांची मागणी आहे.