वेटलिफ्टर मीराबाई चानूला रौप्य
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियोत सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही.अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे.भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.