पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण
| मुंबई | प्रतिनिधी |
केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील येथे 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. बेलसर, जेजुरी या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून डेंग्यू, चिकनगुनीया, मलेरीया आदी साथीच्या आजारांनी थैमान मांडले आहे. त्या अनुषंगाने बेलसर येथील 51 रुग्णांचे नमुने जमा करुन ते एनाआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला, तर 25 चिकनगुनीया व 3 डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला शनिवारी भेट देऊन पाहणी केली व त्वरित पुढील उपाययोजना करण्याचे आदेश दिले.







