। इस्त्रायल । वृत्तसंस्था ।
इस्त्रायलमध्ये सत्तांतर झालं असून तिथे बेंजामिन नेतान्याहू यांना 12 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. इस्रायलचं पंतप्रधानपद आता यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट यांच्या हाती आलं आहे. इस्रायलच्या सत्ताधार्यांमध्ये हा बदल झाला असला तरी हमाससोबतच्या कडवटपणात बदल झालेला दिसून येत नाहीये. बुधवारी सकाळी इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ला केला. -ऋझ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मंगळवारी इस्रायलमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी एक विशाल मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीच्या अवघ्या काही तासानंनतर हा हल्ला करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पॅलेस्टाईनमधून दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडच्या भागाकडे आग भडकावू शकतील अशी यंत्रणा असलेले फुगे सोडले होते. यानंतरच इस्रायलने गाझावर हवाई हल्ला केला. इस्रायलने हवाई हल्ल्याद्वारे हमासची सशस्त्र तुकडी असलेल्या अस-कासम ब्रिगेडची कार्यालये आणि ठिकाणे उध्वस्त केल्याचं पॅलेस्टाईनमधल्या माध्यमांनी सांगितले आहे. या हल्ल्यात गाझात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचेही सांगण्यात आले आहे. इस्रायली सैन्य दलाने या हवाई हल्ल्याबाबत माहिती दिली असून त्यांनी सांगितले आहे की खान युनूस आणि गाझा शहरातील हमासचे दहशतवादी असलेल्या त्यांच्या लश्करी ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने हवाईहल्ले करण्यात आले होते, ज्यात अधिक नुकसान गाझापट्टीत झाल्याचे दिसून आले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे 11 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला होता. या युद्धविरामाला जवळपास 3 आठवडे उलटले आहेत. आता सगळं शांत होईल असं वाटत असतानाच इस्रायल आणि गाझा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.