। चट्टोग्राम । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिकेने दुसर्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली असून भारताची धडधड वाढवली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीची चुरस आता आणखी वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव 6 बाद 575 धावांवर घोषित केला होता. टॉनी डी झॉर्जी (177), त्रिस्तान स्तब्स (106) आणि वियान मुल्डर (105) यांच्या शतकांच्या जोरावर आफ्रिकेने बांगलादेशला बॅकफूटवर फेकले होते. बांगलादेशचा पहिला डाव 159 धावांवर गुंडाळून आफ्रिकेने मोठी आघाडी घेतली होती. बांगलादेशकडून मोमिनूल हकने सर्वाधिक 82 धावा केल्या होत्या. आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने 5 बळी घेतले. तर, डेन पीटरसन व केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. 416 धावांची आघाडी हातात असल्याने आफ्रिकेने बांगलादेशला फॉलो ऑन दिला होता. बांगलादेशच्या दुसर्या डावाला सेनुरन मुथूस्वामी व केशव महाराज या फिरकीपटूंनी सुरंग लावला. कर्णधार नजमूल होसैन शांतोने 36 धावांची खेळी केली. बांगलादेसच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाच गाठता आला नाही. बांगलादेश दुसर्या डावात 143 धावांवर गडगडला. केशव महाराजने 5, तर मुथूस्वामीने 4 बळी घेतले. आफ्रिकेने हा सामना एक डावाने जिंकला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत (62.82) व ऑस्ट्रेलिया (62.50) हे दोन संघ अव्वल स्थानावर आहेत. परंतु फायनलच्या शर्यतीत 5 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. श्रीलंका (55.56), न्यूझीलंड (50) आणि दक्षिण आफ्रिका (54.17 ) हेही संघ फायनलच्या शर्यतीत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या कसोटीपूर्वी आफ्रिकेची टक्केवारी 46.62 इतकी होती.