राजा पटवर्धन
1896 पासून जागतिक ऑलिम्पिक सामने भरविले जात आहेत. जगभरातील 206 देश आज या क्रीडा संघटनेचे सभासद असून इ.स.1900 साली भारतात जन्मलेल्या (ब्रिटिश इंडिया) नॉर्मन प्रिटचार्ड या खेळाडूने, पॅरिसमध्ये भरलेल्या ऑलिम्पिकमधे ‘भारतीय’ म्हणून सहभाग घेतला होता. धावण्याच्या शर्यतीत याने दोन रौप्यपदके जिंकली. इंग्रज आईबापांच्या पोटचा नॉर्मन भारतीय कसा? तो भारतात जन्मला (कलकत्ता), भारतातच शिकला म्हणून!. त्याने मिळवलेल्या दोन पदकांपैकी एक पदक इंग्लिश म्हणून.तर दुसरे पदक भारतीय म्हणून देण्याचे ठरले. असा या वादावर पडदा पडला.! आशिया खंडातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारत पहिला देश ठरला. 1920 पासून भारत (खपवळर) या नावानेच सहभाग सुरु झाला. ब्रिटिश भारतातच मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिकची तीन सुवर्णपदके भारताला जिंकून दिली.(1928,32,36) यापुढे भारताचा सर्वोच्च क्रीडा खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी ऐवजी ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार आहे.असो. स्वतंत्र भारतानेही मुख्यतः हॉकी, तसेच, कुस्ती, दौड, बॅडमिंटन, नेमबाजी, वजन उचलणे, टेनिस, आणि आत्ता (2021) भालाफेकीत अशा मोजक्याच क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली आहे. भारतात गल्लोगल्लीत लोकप्रिय असलेल्या क्रिकेटला ऑलिम्पिकमधे स्थानच नाही. ज्यावेळी ऑलिम्पिक सुरु झालं तेव्हा क्रिकेटचे चार संघही नव्हते. तो खेळ लोकप्रियही नव्हता. भारतात क्रिकेटला प्रसिद्धी, पैसा, सत्ताधार्यांचे पाठबळ सर्वकाही असून क्रिकेट संघटना तसा प्रयत्नही करीत नाहीत. धनाढ्य बीसीसीआयला दुय्यम स्थान मिळेल अशी शंका वाटते? की ऑलिम्पिक गाजविणार्या प्रमुख अमेरिका, चीन, जपान, रशिया इ. देशात क्रिकेट खेळलाच जात नाही हे कारण आहे? एक सुवर्ण, दोन रौप्य, आणि चार कांस्य अशी एकूण फक्त सात पदके मिळवणार्या भारतीय पदक विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करताना भारताचा ऑलिम्पिक संघटनेतील आवाज फार फार क्षीण आहे हे लक्षात ठेवूया. ऑलिम्पिक विजयाची क्रमवारी ठरवताना सर्वप्रथम, मिळवलेल्या सुवर्ण पदकांचा विचार होतो. एकूण पदक संख्येचा नाही. इंग्लंडने (यु.के) एकूण पदके जरी 65 मिळवली तरी त्या देशाला क्र. चार मिळाला व जपानची एकूण पदके 58 म्हणजे इंग्लंडपेक्षा सात कमी असूनही जपान तिसर्या क्रमांकावर मिरवतो, कारण जपानला 27 सुवर्णपदके मिळाली व इंग्लंडला 22. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे कारण अमेरिकेला सर्वाधिक 39 सुवर्ण पदके मिळाली.चीनचा क्र. दुसरा, कारण चीनची सुवर्णकमाई 38 पदकांची. अमेरिकेने पुन्हा आपल्या निर्विवाद नेतेपदावर शिक्कामोर्तब केले ते सुवर्ण 39, रौप्य 41, कांस्य 33 अशी सर्वाधिक एकूण 113 पदके मिळवून. अमेरिकेने तीनही पदकांवर आपला प्रथम क्रमांक टिकवला आहे. दुसर्या क्रमांकावर अर्थातच चीन उंच व ताठ मानेने उभा आहे. 38,32,18 अशी एकूण 88 पदके चीनने मिळवली आहेत. अमेरिका व चीनच्या मानाने जपान हा खरोखरच चिमुकला देश आहे.जपानची लोकसंख्या बारा कोटी 65 लक्ष म्हणजे महाराष्ट्राहूनही कमी आणि पदकसंख्या 27,14,17.एकूण.58.हाच धागा पकडून आपण ऑलिम्पिकमधल्या पहिल्या दहा देशांची पदसंख्खा पाहिली की चित्र स्पष्ट होते. अमेरिका, चीन, जपान आपण वर पाहिलेच आहेत. इंग्लंड 22,21,22(65).
रशिया 20,28,23 (71)
ऑस्ट्रेलिया 17,7,22 (46)
नेदरलँड 10,12,14 (36)
फ्रान्स 10,12,11 (33)
जर्मनी10,11,16 (37)
इटली 10,10,20(40)
वरील सर्व देश हे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असून आर्थिक दृष्ट्याही समृद्ध आहेत.आणखी एक गमतीचा भाग असा की अमेरिका, चीन, जपान हे सकल घरेलू उत्पादनातही अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. त्यांनीच तो क्रम सर्वाधिक सुवर्ण पदकेही मिळवून टिकवला. इथे भारताची तुलना करणे क्रमप्राप्त आहे. वरील सकल उत्पादनाचा विचार करता भारत पहिल्या सहामध्ये गणला जातो. मग आपण पहिल्या सहामध्ये असण्याऐवजी 48 क्रमांकावर का फेकलो गेलो? सुभेदार (लष्करातील जवान) नीरज चोप्राने 87.58 मीटर दूर भाला फेकूनच आपली शान राखली. नाही तर भारत 68 क्रमांकावर दिसला असता.!
ऑलिम्पिकच्या पदक क्रमवारीत चीन दुसर्या स्थानावर तर लोकसंख्येत पहिल्या स्थानावर. आपली लोकसंख्या चीनच्या पाठोपाठ दुसर्या स्थानावर असून (140 कोटी) पदक क्रमवारीत भारत 48 व्या स्थानी. पदकात भारतापेक्षा खूप सरस कामगिरी करणारे अनेक देश आपल्या राज्यांपेक्षाही लहान आहेत. काही देशांची लोकसंख्या तर आपल्या जिल्ह्यांएवढीही नाही.! तेही आपल्यापुढे.! मुद्दा असा की आपली अफाट लोकसंख्या असूनही गुणवत्तेत आपली केवीलवाणी अवस्था आहे. याचे मुख्य कारण अजूनही आपण दारिद्रय निर्मूलनात अयशस्वी आहोत. उपाशीपोटी आणि कुपोषितांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. वय वाढते तसे नैपुण्य आपोआप वाढत नाही. अन्नपाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, वीज, आरोग्य यासह सर्व सेवा सुविधा हक्काने मिळाल्याशिवाय जागतिक दर्जेदार कामगिरी करता येत नाही. या सगळ्यांचं एकत्रित मोजमाप ‘मानवी विकास निर्देशांक’ करतो. 189 देशात भारत 131 स्थानावर आहे.किमान 40% लहान मुले कुपोषित आहेत. वेचून वेचून 128 सशक्त सुदृढ क्रीडापटूंना भारताने 32व्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठवले. वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, आणि भालाफेकीत आपण एकूण फक्त सात पदके मिळवली. अशीच सात पदके मिळवणारे इराण, बेलारुस, बेल्जियम, ऑस्ट्रिया, आणि अझरबैजान असे देश आहेत. यांची एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्रा इतकी. दुर्दैवाची किंवा संतापजनक बाब अशी की 340 सुवर्ण, 338 रौप्य, 402 कांस्य अशा एकूण 1080 पदकांना एकही मराठी भाषिक खेळाडू स्पर्श करु शकला नाही. महाराष्ट्र संपूर्ण भारतात एकूण जी डी पीत अव्वल असूनही सही अवस्था आहे! 1952 फिनलंड-हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेते खाशाबा जाधव अमर रहे!
मीराबाई चानू मणिपूरची, लोवलिना आसामची, पी वी सिंधु आंध्र प्रदेशची. बजरंग, रविकुमार हे दोन्ही मल्ल कुस्तीगीर हरियाणाचे.अर्थातच सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राही हरियाणाचाच. असे म्हणतात की नीरज हा पानिपतातून (1761 युद्ध) न परतलेला मावळ्यांचा वंशज.असो.
रशियाचे एकसंध संघराज्य (णडडठ) टिकून होते तोपर्यंत अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे प्रात्यक्षिक ऑलिम्पिकमध्ये पहायला मिळायचे. काटे की टक्कर असायची. 1991 नंतर जुन्या रशियाची 15 राष्ट्रे झाली. तरीही रशियाने 20,28,23 अशी 71 पदकांची भरघोस कमाई करुन पाचवा क्रमांक गाठला. ती जागा आता चीनने घेतली आहे.
2016 साली रिओ(ब्राझील)ऑलिंपिक मध्ये आपण 117 जणांचा चमू 15 क्रीडा प्रकारांचा की पाठवला होता. एक रौप्य व एक कांस्य अशी केवळ दोन पदके भारताने मायदेशी आणली. दोन वरून एका सुवर्णासह एकूण सात ही हुरुप वाढवणारी बाब आहे.
टोकियो ऑलिम्पिकचा स्पष्टसंदेश हा की भरीव पदक कमाईसाठी आर्थिक महासत्तेच्या खर्याखुर्या मार्गवरून जायला हवे. आपल्या सीमा चीन आणि पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. चीनची 38,32,18 एकूण 88 अशी कमाई. आपली 1,2,4 एकूण 7 अशी कमाई. फरक फारच मोठा आणि दूरचा आहे.आपली लोकशाही इतकी मजबूत व समृद्ध व्हायला हवी की पदक संख्या चीनशी तुल्यबळ झाली की चीनलाही लोकशाही व्यवस्था स्विकारावीशी वाटेल! आपल्यापेक्षा एक चतुर्थांश पाकिस्तानला (शत्रू राष्ट्राला) एकही ऑलिम्पिक पदक मिळाले नाही. यात धन्यता मानणे हे विकृतीचे लक्षण आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही. पुढच्या पॅरिस (2024) ऑलिम्पिकला शुभेच्छा.