विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मनपाकडे मागणी
पनवेल | वार्ताहर |
तळोजा फेज वन येथील कब्रस्थान हस्तांतरित करून दफन विधी करता खुले करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजे फेज – 1, सेक्टर 15, येथील अंतिम भूखंड क्रमांक 8/9 येथे सिडको प्राधिकरणामार्फत सुसज्ज दफनभूमी तयार करण्यात आली आहे. पनवेल पालिकेने सिडको सोबत हस्तांतरणाची कार्यवाही केली नसल्याने कब्रस्तान दफनविधी करिता खुले करण्यात आले नाही. यामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना दफनविधी करिता पनवेल, खारघर, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे कुटुंबियांना ह्याचा नाहक त्रास आणि खर्चिक बाब पडत आहे. तातडीने सदर कब्रस्तान बाबत सिडको प्रशासना सोबत हस्तांतरणाची कार्यवाही करून करार नामा करण्यात यावा व समाज बांधवांना सदर करब्रस्तान दफन विधी करिता खुले करण्यात यावे. अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे, नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी केली आहे.