आ. जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
आगामी रायगड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यातील चुरस दिवसेंदिवस वाढत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी मुरुड तालुक्यातील विहुर, मजगाव, कोर्लई, मुरूड शहर आदी ठिकाणी येऊन शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांचा गाठीभेटी घेतल्या. आ. पाटील यांनी मुरूड शहरातील अनंत गीते यांच्या कार्यालयात भेट देऊन महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांशी संवाददेखील साधला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूणच व्यूहरचनेबद्दल त्यांनी या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. महायुतीचे उमेदवार तटकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शेकापचे सहकार्य घेऊनही नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फसवल्याने उमेदवार पंडित पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्याचा वचपा या निवडणुकीत घ्यायचा असल्याची भूमिका पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, आ. जयंत पाटील यांनी तालुक्याचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले. ठिकठिकाणी यावेळी आ. जयंत पाटील यांना कार्यकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे समजले. यावेळी शेकापचे माजी सभापती चंद्रकांत कमाने, मनोहर बैले, तुकाराम पाटील, राहिल कडू, इम्तियाज मलबारी, जमीर कादिरी, रिझवान फहिम, एजाज उलडे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अस्लमभाई हलडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुदेश घुमकर, रा.काँ.शरद पवार गटाचे नौशाद शाबान, हाफिजुल कबले सैफुल्ला फिरफीरे, हनिफ लांबाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.