नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेरूने कोलंबियाचा 2-1 असा पाडाव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे. सर्जियो पेना याने 17व्या मिनिटालाच पेरूला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, दुसर्या सत्राच्या सुरुवातीला कोलंबियाने जशास तसे प्रत्युत्तर देत सामन्यात बरोबरी साधली. 53व्या मिनिटाला कोलंबियासाठी मिग्यूएल बोर्जा याने गोल साकारला. मात्र, 64व्या मिनिटाला कोलंबियाचा बचावपटू येरी मिना याने केलेल्या स्वयंगोलमुळे पेरूला विजय मिळवता आला.
या विजयासह पेरू ‘ब’ गटात तिसर्या स्थानी पोहोचला असून कोलंबियाने तीन सामन्यांत चार गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. ब्राझीलने दोन्ही लढती जिंकून सहा गुणांची कमाई करत अग्रस्थान कायम राखले आहे. गटातून चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
“कोपा अमेरिका स्पर्धेत या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आम्ही चांगल्या स्थितीत असून पुढे चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असू,’’ असे पेरूचा बचावपटू रेनाटो तापिया याने सांगितले. पेरूला सलामीच्या सामन्यात ब्राझीलकडून 0-4 अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर प्रशिक्षक रिकाडरे गॅरेसा यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.