| नैरौबी | वृत्तसंस्था |
अंडर-20 जागतिक अॅथलिटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 17 वर्षीय शैली सिंहनं इतिहास रचला आहे. लांब उडी प्रकारातील उदयोन्मुख खेळाडू आणि दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज हिच्याकडून खेळाचे धडे गिरवणार्या शैलीनं 6.59 मीटर लांब उडी घेत रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदकापासून ती केवळ एका सेंटी मीटरनं मागं राहिली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळं अंडर-20 जागतिक अॅथलिटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेत स्वीडनची 18 वर्षीय माजा असकाग हिनं 6.60 मीटरची लांब उडी घेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
झाशी येथील रहिवासी असलेल्या शैलीनं महिलांच्या लांब उडी प्रकारात फायनलमध्ये पहिल्या आणि दुसर्या प्रयत्नात 6.34 मीटर लांब उडी घेतली. मात्र, यानंतर तिसर्या प्रयत्नात तिनं 6.59 मीटरची उडी घेतली. पण तिचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल गेला. अखेर शेवटच्या प्रयत्नात तिनं 6.37 मीटरचं अंतर गाठलं.