भेटीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर चर्चा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर रणनीतिकार म्हणून काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये पंतप्रधान मोदींसमोर विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच प्रशांत किशोर आणि पवार यांच्यात झालेली भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत काही दिवसांपूर्वी यूपीए -2 बद्दल बोलले होते. विरोधी पक्षांमध्ये कॉग्रेसविना यूपीए -2 च्या स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सध्या काँग्रेस पक्षात नेतृत्व नसणं. अशा परिस्थितीत विरोधी नेतृत्व, सामर्थ्यवान मोदी आणि भाजपासमोर कोणता चेहरे असू शकतात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जगन मोहन रेड्डी, कॅप्टन अमरिंदर सिंग, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे रणनीतिकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आजची पवार आणि प्रशांत किशोर भेट ही मोठी उत्सुकतेची असणार आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापन कार्यक्रमानिमित्त काँग्रेस आणि शिवसेना आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचं हे निवडणुकांशी संबंधीत आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
प्रशांत किशोरने यापूर्वी पीएम मोदी सोबत काम केले आहे. यानंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही रणनीतिकारांची भूमिका साकारली आहे. जगनमोहन यांच्यासोबत आंध्र प्रदेशात काम केले आहे. आणि अलीकडेच ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापनेत त्यांची उल्लेखनीय भूमिका सगळ्यांनाच माहिती आहे.