। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि.22) करण्यात आले होते. शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तरुणांसह मध्यम वयोगटातील मंडळींनी सहभाग घेऊन रक्तदान केले. एकूण शंभर जणांनी रक्तदानाचा हक्क बजावून बांधिलकी जपली.
प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्या सहकार्याने चेंढरे येथील कच्छी भवनमधील सभागृहात शुक्रवारी सकाळी रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा तथा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. गौतम पाटील, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, सुषमा पाटील, संजना कीर, अशोक प्रधान, अश्वीन लालन, अमित नारे, रवी थोरात, संदीप कीर, संजय कांबळे, अॅड. आशिष रानडे, कपिल अनुभवणे, किमया घरत आदींसह प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्हा रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, सुनील बंदीछोडे, कर्मचारी गणेश भोये उपस्थित होते.
धावपळीच्या जीवनात अपघात व इतर आजारपणावर उपचार करताना रक्ताची गरज निर्माण होते. रुग्णालयात त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशांत नाईक मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करण्याचा उपक्रम हाती घेतला. सकाळपासून दुपारपर्यंत सुरु असलेल्या या शिबिरात 100 जणांनी रक्तदान करून बांधिलकी जपली. प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला सुरुवातीपासूनच रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला. शहरातील अनेक तरुणांसह मित्रमंडळातील पदाधिकारी, सदस्य तसेच मध्यम वयोगटातील मंडळींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान करणार्या व्यक्तींना माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
प्लास्टिकमुक्तीचा संदेश
प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होत असताना मानवी आरोग्यदेखील बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या एक पाऊल पुढे जात प्रशांत नाईक मित्र मंडळांनी रक्तदान करणार्या व्यक्तींना कापडी पिशवी देऊन प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक करण्यात आले.