शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रुपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रुपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? कधीच नाही, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेलफ, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.