। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था नासा ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेअंतर्गत खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व त्यांच्या टीमने 6 लघुग्रहांचा प्राथमिक शोध लावला असल्याची माहिती ग्लोबल मिशन स्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.
नासाने सुरू केलेल्या लघुग्रह शोध मोहिमेमध्ये मंगळ व गुरु ग्रहांच्यामध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह शोधण्याचे विशेष कार्य होते, परंतु खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व त्यांच्या टीमने केलेल्या निरीक्षणांमध्ये 6 लघुग्रह सापडले.त्यातील 3 लघुग्रह विशाल कुंभारे यांनी शोधले आहेत. या 6 लघुग्रहांची प्राथमिक शोध यादीमध्ये नोंद झालेली आहे. त्यानंतर लघुग्रहांचे व त्याच्या हालचालींचे निरीक्षण करून त्याची सत्यता पडताळून त्याचे नामकरण केले जाईल. या प्रक्रियेसाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागतो, असे विशाल कुंभारे यांनी महितीद्वारे सांगितले .
हि लघुग्रह शोध मोहीम 3 मे ते 28 मे 2021 दरम्यान राबविली गेली. यासाठी लागणारी निरीक्षणे अमेरिकेच्या हवाई बेटावरील पॅन स्टार्स टेलिस्कोपमधून घेतली गेली होती. या शोधमोहिमेमध्ये कुंभारे यांना सोवन आचार्य, सा सिटीझन सायन्स ग्रुप व इतर 4 निरीक्षकांचे सहकार्य मिळाले आहे.