अवजड वाहने फसून होतात अपघात
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग पावसाळ्यात मृत्यूचा सापळा बनला आहे. क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची या मार्गावर वाहतूक होताना दिसत आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम राहिले असून चिखलात मोठी वाहने फसून अपघात होत आहेत. राबगाव नजीक मालवाहू ट्रक शनिवारी दि.(19) भर रस्त्याच्या मधोमध रुतल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तासनतास हा ट्रक जाग्यावरच असल्याने अपघाताची भीती वाढली आहे.
वाकण पाली खोपोली मार्ग रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असुरक्षित व धोकादायक खोदकाम केले आहे. त्यामुळे दिवस व रात्री जीवघेण्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलक व कमजोरपट्ट्या देखील तुटून पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाकण पासून पाली फाटापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गाची तकलादू डागडुजी करण्यात येते, मात्र आजमितीस पुन्हा महामार्गाची जैसे थे अवस्था झाली आहे.
सद्यस्थितीत हा मार्ग जागोजागी खोदून ठेवला आहे, शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी देखील घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना जिव मुठीत घेवून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रशासनाने या मार्गाची दुरुस्ती व देखभाल करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाली खोपोली मार्ग सुस्थितीत यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पावसाळा असल्याने मार्गावर जिथे पाणी व चिखल साठला आहे. तिथे लगेच कठीण मुरूम व खडी टाकून सपाटीकरण करून घेणार आहोत. 2-4 दिवसांत एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम पूर्ण करून मार्ग सुस्थितीत केला जाईल व तेथून वाहतूक वळवली जाईल.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.