एमटीडीसी आणि एमएमआरडीएच्या नवीन आराखड्याची अंमलबजावणी । नेरळ । प्रतिनिधी ।
पश्चिम घाट प्रतिबंधक क्षेत्र आणि भीमाशंकर अभयारण्य प्रतिबंधक क्षेत्र परिसर आणि कर्जत तालुक्यातील ग्रीन झोन जमिनीवर आता पर्यावरण पूरक पर्यटन फुलणार आहे. महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानबरोबरच कर्जत तालुक्यातील पर्यटनालाही नवी झळाळी देण्याचा आराखडा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने तयार केला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून हा विकास करण्याचे नियोजन असून, त्यामुळे कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे विकसित होण्याबरोबरच तेथे रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
माथेरानच्या पर्यटन विकासासाठी मागील दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास 36 कोटी रुपयांचा निधी पर्यटन विकासाकरिता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपलब्ध करू शकलो. भविष्यकाळातील पर्यटन वाढ लक्षात घेऊन अनेक प्रयत्न सुरू आहेत. कर्जत तालुका हा सध्या ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे दिवसेंदिवस येथे कृषी पर्यटनात वाढ होत आहे. मुळातच निसर्गरम्य परिसर व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने कर्जत तालुका अल्पावधीतच फार्म हाऊसचा तालुका म्हणून प्रसिद्ध झाला. हे असतानाच या तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने विकास आराखडा मांडून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. खांडस- नांदगाव या निसर्गसंपन्न प्रदूषण विरहित भागाला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, ही तालुक्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कर्जत तालुक्याला पर्यटनाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. मुंबई-पुणेकरांना येथील परिसर नेहमीच आकर्षीत करत आहे. फार्म हाऊसचा तालुका म्हणून लौकिक असलेल्या कर्जतचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार असून त्यामुळे येथील व्यावसायिक पर्यटन केंद्रांना सुगीचे दिवस येणार आहेत.