तटकरे कुटुंबाचा डीएनए काढला तर ‘गद्दार’च निघेल
| नेरळ-कर्जत | प्रतिनिधी |
गद्दारी ही सुनील तटकरे यांच्या रक्तात असून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी केल्यास ती ‘गद्दार’च निघेल. तटकरे म्हणजे महायुतीला लागलेला कॅन्सर असून तो कॅन्सर वेळीच काढला पाहिजे, अन्यथा महायुती नक्कीच धोक्यात येईल. एखादा कांदा नास्का असला की पोत्यातील सर्वच कांदे नासतात. त्यामुळे नासाका कांदा काढून फेकून देणे गरजेचे आहे. या मतदार संघात अपक्ष उमेदवारी लढवत असलेले सुधाकर घारे यांना तटकरेंनीच उभे केले आहे. कारण महायुतीत बंडखोरी केली तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट त्यांना पाठिंबा देऊन मला धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. परंतु, मी तटकरेंना घाबरत नाही. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. तोंडाने बोलून कोण ऐकत नसेल तर तोंडात मारायचे, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, असे स्पष्ट प्रतिपादन महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार आ. महेंद्र थोरवे यांनी केले आहे. पोसरी येथील शिवतीर्थ सभागृहात आ. महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना थोरवे म्हणाले की, कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून आहे. परंतु, या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या उमेदवाराला माझ्यासमोर उभे केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवाराबद्दल मला काही बोलायचे नाही, कारण विरोधक हे त्यांचे काम करीत आहेत. मात्र, सुनील तटकरे महायुतीचा भाग असताना देखील त्यांनी कर्जत मतदारसंघात त्यांच्याच कार्यकर्त्याला बंडखोरी करायला लावली आहे. राज्यात महायुतीचे नेते प्रत्ये जागेला महत्वाचे योगदान देत आहेत. मात्र, कर्जतमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे युतीधर्म पाळत नाहीत. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर सुधाकर घारे निवडणूक लढवणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सुनील तटकरे हे स्वतः सुधाकर घारे यांचा प्रचार करीत असून घारे हा माझाच उमेदवार असल्याचे जाहिर रित्या सांगत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे.
बॅ. अतुलेसाहेबांना राजकारणातून संपवले
कर्जतमध्ये सुधाकर घारे यांना सुनील तटकरे यांचे पाप असून, महायुतीत छेद देण्याचे काम तटकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. सदैव भ्रष्टाचार करणारे हे नेतृत्व असून, राजकीय काटा काढण्याचे काम सुनील तटकरे करीत असून, बॅरिस्टर अंतुले यांना राजकाणातून संपवण्याचे काम केले.
…म्हणून लाडांचा घात
सुरेश लाड यांना कटकारस्थान करून त्यांना बाजूला करण्याचे काम तटकरे यांनी केले. सुरेश लाड यांना मंत्री करावे लागेल आणि आपल्या मुलीला मंत्री करता येणार नाही म्हणून सुरेश लाड यांचा घात केला. सुनील तटकरे हा महायुतीला लागलेला कॅन्सर आहे, तो वेळीच हद्दपार केला नाही त्यांना महायुतीला कॅन्सर लागेल.
भोगावलेंविरोधात धक्कातंत्र
भरत गोगावले हे नेतृत्व करून राज्यात सत्तांतर करण्यात मोठी भूमिका असून, त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील खानविलकर यांना पाठवले असून, तेथे भरत गोगावले यांना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या माणसाने किती तरी पाप करण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. मी रणांगणात उतरलो आहे.