केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची दिलासादायक माहिती
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून, आता तिसर्या लाटेचे संकेत दिले जात आहे. तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. या तिसर्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता पसरली आहे. पण, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना जास्त प्रभावित करणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
कोरोना दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षात जास्त घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. या लाटेदरम्यान अनेक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे पाहायला मिळाले. पण, आता येणारी तिसरी लाट ही लहान मुलांना अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. पण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाची येणारी लाट मुलांना जास्त प्रभावित करणार नाही. ज्या मुलांना कोरोना होतो, ती मुलं जास्त करून असिमन्टमॅटिक असतात. म्हणजेच, त्यांच्यामध्ये संक्रमणाची लक्षणे खूप कमी असतात.
मंत्रालयाने पुढे दिलेल्या माहितीनुसार, बाधित झालेल्या खूप कमी मुलांना आता रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. जर पूर्णपणे निरोगी मुलांना संसर्ग झाला तर त्यांची थोडीशी तब्येत खराब होते आणि ते रुग्णालयात न जात पटकन बरे होतात. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान ज्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली होती. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी
लहान मुलांना कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी कोवॅक्सिन लसीची चाचणी लहान मुलांवर सुरू करण्यात आली आहे.डॉ. एन. के. अरोरा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हाती येतील. मुलांना करोनाची लागण होऊ शकते, पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
गंभीर परिणामांची शक्यता कमी
लहान मुलांना असणार्या करोनाच्या धोक्याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांच्या मतानुसार भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना करोनाची लागण जरी झाली, तरी ते गंभीररीत्या आजारी पडणार नाहीत किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही. सहव्याधी असणार्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणार्या मुलांव्यतिरिक्त इतर मुलांवर करोनाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असल्याची भूमिका देशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मांडण्यात येत आहे.