। सुतारवाडी । वार्ताहर |
पावसाळा सुरू झाला की ताम्हाणी घाटातील निसर्गाचे सौंदर्य खुलायला लागते. या वर्षी ही पाऊस अगदी वेळेवर जून महिन्यात सुरू झाल्याने व पावसाचे जोर कायम असल्याने येथील धबधबे वाहायला सुरूवात झाली आहे.
ताम्हाणी घाट म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची खाण. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच डोंगर आहेत. या डोंगरावर निसर्गाची किमया म्हणून हिरवी शाल पांघरून निसर्ग पर्यटकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असला तरी कोरोनामुळे गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही शासनाने बंदी आणल्यामुळे पर्यटकांचा दिसणारा किलबिलाट, आंबट शौकीकांचा धांगड धिंगाणा, कुटुंबासह धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेणारे पर्यटक फिरकणार नाहीत.
दरम्यान पावसाचे प्रमाण कमी असले तरी या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. येथे चहुबाजूने वेढलेल्या हिरव्यागर टेकड्या, झाडे या निसर्गाच्या सानिध्यामुळे या धबधब्यांचे सौंदर्य अजुनच खुलून दिसत आहे. परंतु कोरोनामुळे बंदी असल्याने पर्यटकांना यावेळी सारे दुरूनच पहावे लागणार आहे.