स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून काढले बाहेर
I पाली I वार्ताहर I
पालीतील सरसगड किल्ल्यावर गेलेला एक तरुण शनिवारी (ता.3) सायंकाळी पायऱ्या उतरतांना पाय घसरून दरीत पडला. जबर जखमी झालेल्या या तरुणाला पालीतील देऊळवाडा व आगर आळी येथील तरुणांनी अथक परिश्रमाने जीवाची बाजी लावून बाहेर काढले. रात्री आठ च्या दरम्यान पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात नेण्यात आले.
निलेश सावंत असे या तरुणाचे नाव असून तो पालीतील रहिवाशी आहे. तो आपल्या 2 मित्रांसह किल्ल्यावर गेला होता. दरम्यान पायऱ्या उरत असतांना पाय घसरून शेजारच्या दरीत कोसळला आणि डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार लागून बेशुद्ध झाला होता. त्याच्या सोबत असलेल्या सहकार्यांना त्याला वर काढणे शक्य नव्हते. मग येथील तरुणांना ही बातमी कळताच 15 ते 20 तरुण किल्यावर गेले. ताबडतोब प्रदीप गोळे व प्रणव रटाटे हे तरुण जोखीम घेऊन दरीत उतरले व दोरी बांधून निलेश सावंत याला वर काढले.
त्यानंतर झोळीत टाकून मिलिंद गोळे, शुभम वरंडे, आर्यन जाधव, सुरज वरंडे, वरून रटाटे, ऋषिकेश वरंडे, केदार वरंडे, अथर्व कडू, ओंकार फाटक, किरण मढवी, केदार मढवी, विघ्नेश मढवी, प्रेषित ठोंबरे, शुभम घाडगे, स्वरूप मढवी, ऋषिकेश ठोंबरे, अमित ठोंबरे, गजानन काटकर, शुभम फोंडे आदी तरुणांनी खाली आणून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथून या तरुणाला पुढील उपचारासाठी पनवेल येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत असून प्रकृती स्थिर आहे.