प्रसाशनाचे दुर्लक्ष
। महाड । प्रतिनिधी ।
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडराणा अत्यंत महत्वाचा वरंधा घाट रस्ता अखेर वाहतुकीला सुरु करण्यात आला. चार महिन्यापासुन या घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते आणि त्यामुळे घाट मार्ग बंद करण्यात आला होता. वाहतुक सुरु होताच पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून देखिल दुर्लक्ष केले जात आहे. वरंधा घाट रस्त्यावर होणारी पर्यटकांच्या गर्दीवर शासनाकडून निर्बध घालणे आवश्यक असुन या परिसरांमध्ये पोलिस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रांतील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर या महत्वाच्या शहरांना जोडणारा वरंधा घाटांत सातत्याने दरडी कोसळत असल्याने दुरुस्तीची कामे केली जात आहेत. गेल्या दोन वर्षा पासुन हा घाट रस्ता सातत्याने दुरुस्ती करीता बंद करावा लागत आहे. वरंधा घाटांतुन पुण्याकडे जाणारी वाहतुक मोठ्या प्रमाणात असल्याने पुण्याकडे जाणार्या वाहन चालकांना महाबळेश्वर मार्गाने जावे लागत होते. हा मार्ग पुर्णपणे गैर सोयीचा असल्याने वरंधा घाट लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी सर्व स्थरातुन केली जात होती. अखेर दोन दिवसापुर्वी हा मार्ग वाहातुकीला खुला करण्यात आला.
पावसाळ्यांतील वरंधा घाट हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र असल्याने दर वर्षी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी कायम असते. रस्त्यालगत असलेले धबधबे तरुणाईला आकर्षित करतात, याच रस्त्यावर असलेले श्री वाघजाई देवीचे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान असल्याने देवीच्या दर्शन करीता भाविक देखिल येत असतात. पर्यटकांमुळे येथील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला असुन मंदिर परिसरांमध्ये छोटी हॉटेल सुरु करण्यात आली असुन मुळसधार पावसामध्ये भजीचा आस्वाद घेण्यासाठी हिरडोशी, वरंध, बिरवाडी, महाड, पोलादपुर या परिसरातील तरुण मोटार सायकलने पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. तब्बल चार महिन्या नंतर घाटा मार्गाच्या दुरुस्तीचे काम संपल्यानंतर पर्यटकांची घाटामध्ये गदी वाढू लागली आहे.