आदिवासी विकास विभागाची विशेष मोहिम : ऑक्टोबर अखरेपर्यंत वाढविला कालावधी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा कालावधी 31 ऑक्टोंबर, 2021 रोजीपर्यंत वाढविण्यात आला आहे. ही मोहीम सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतच ही मोहीम राबवण्यात येणार होती. हा कालावधी अपुरा असून त्यात वाढ करण्याची मागणी आदिवासी बांधवांसाठी काम करणार्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे केली होती. याची दखल घेऊन अखेर आदिवासी विकास विभागाने या विशेष मोहिमेचा कालावधी 31 ऑक्टोबर पर्यंत वाढविला असून याबाबत आदिवासी विकास विभागाने पत्र काढले आहे.
अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्तरावर विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सदर मोहिमेचा कालावधी अपुरा असल्यामुळे हा मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी श्रमजीवी संघटनेसह, आदिवासी बांधवांकडून होत होती. त्यामुळें विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना मिळावा यासाठी समर्थन संस्थेच्या वतीने आदिवासी विकास विभागाला पत्र देऊन विशेष मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती.
समर्थन संस्थेच्या मागणीची दखल घेत 8 ऑक्टोबर रोजी पत्र काढून या विशेष मोहिमेचा कालावधी 31 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. शिवाय या विशेष मोहिमेकरिता आवश्यकतेनूसार जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांमध्ये याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच, शिबिराच्या अंमलबजावणीत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व गावातील पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात यावा असेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधव आणि संघटनांकडून समाधन व्यक्त केले जात आहे.