भूसंपादन मोजणीला शेतकर्यांचा विरोध
प्रांताधिकार्यांना निवेदन सादर
पेण | वार्ताहर |
विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्यांनी विरोध दर्शविला असून या बाबत प्रांतधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहनलाल म्हात्रे, धर्माजी ठाकूर, गणेश म्हात्रे, पी.के.ठाकूर, सुनील ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, अरूण ठाकूर, परशुराम पाटील, वासुदेव पाटील, गजानन ठाकूर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मेट्रो प्रकल्पाच्या भूसंपादन मोजणी करण्यात येत आहे. या मोजणीला विरार-अलिबाग बहुउद्देशीय मेट्रो प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समिती (रावे, कोपर, गोविर्ले, जिते, चूनाभट्टी, बलवळी, आंबिवली) या 7 गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. कारण या प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकर्यांना पुरेशी माहिती नसल्याने ते अंधारात आहेत. शेतकर्यांचा प्रकल्पाला विरोध नाही. परंतु जमिनी गेल्यानंतर त्यांना काय सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. हे शेतकर्यांना समजले नाही. त्यामुळे जनसुनावणी घेऊन त्याबाबत लेखी माहिती मिळावी अशी मागणी शेतकर्यांची असून याबाबत शेतकर्यांनी 30 एप्रिल 2019 रोजी प्रांतधिकारी कार्यालयात तसेच 9 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. तरीही मोजणी प्रक्रिया सुरूच असली तरी शेतकर्यांनी ती वेळोवेळी उधळून लावली आहे. शेतकर्यांना मोजणी प्रक्रियेबाबत 16/7/2021 रोजी कोपर तलाठी कार्यालयातून शेतकर्यांना 17 व 18 जून या दोन दिवसात मोजणी असल्या बाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु अचानक आलेले या नोटिसांमुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.पावसाळी हंगाम असल्याने काही शेतकर्यांना शेतीच्या कामांसाठी शेतावर जावे लागत आहे तर काही बाहेरगावी असल्याने ते मोजणीला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे या जागेबाबत जनसुनावणी घेण्याची मागणी शेतकर्यांची आहे. जनसुनावणी न घेता मोजणीला शेतकर्यांचा विरोध असून वेळ आल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकर्यांचे प्रश्न जाणून घेऊन येत्या दोन दिवसात बैठकीचे आयोजन करणार आहे. शेतकर्यांचा या बहुउद्देशीय प्रकल्पाला विरोध नाही. परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण देखील शासनाचा एक भाग असल्याने शेतकर्यांचे प्रश्न जाणून घेउन नंतरच मोजणीला सुरूवात केली जाईल.
विठ्ठल इनामदार ,उपविभागीय अधिकारी