। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लॉकडाऊन आणि उधाणामुळे समुद्रातील कचरा किनार्यावर येऊन अलिबागचा समुद्र किनारा अस्वच्छ झाला होता. अलिबाग मधील तरुणांनी हा कचरा पाहिल्यानंतर कसलाही विचार न करता समुद्रकिनारा स्वच्छ करण्यास सुरुवात केली. बघता बघता एक एक करीत अनेक हात या स्वच्छता मोहिमेत गुंतत गेले आणि अस्वच्छ झालेला समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ सुंदर दिसू लागला.
अलिबागचा समुद्र किनारा म्हणजे पर्यटकांचे आकर्षण. दररोज मोठया संख्येने किनार्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या आनंदाला कोरोनामुळे लॉकडाऊनचे गालबोट लागल्याने गेले काही महिने उत्साहाची भरती येणारा समुद्रकिनारा पर्यटकांच्या ओहोटीमुळे उदास झाला होता. आता हळूहळू पर्यटकांची पावले पुन्हा वळण्यास सुुरुवात होत असली तरी त्यावर देखील निर्बंध आहेतच. पर्यटकांची संख्या कमी असली तरी समुद्रावर उधाणाच्या भरतीमुळे समुद्रातील कचरा किनार्यावर साचत आहे. या कचर्यामुळे सुंदर समुद्र किनारा अस्वच्छ दिसू लागला. हे सारे मंदार पावशे आणि इतर शेकापचे युवा कार्यकर्ते यांच्या मनाला पटला नाही. त्यामुळे एटीव्ही ची सवारी पर्यटकांना घडवणार्या या तरुणांनी एकत्र येत समुद्रावरील कचरा उचलण्याचा निर्णय घेतला. बघता बघता अनेक तरुण एकत्र येत कचरा उचलू लागल्याने पुन्हा एकदा अस्वच्छ झालेला अलिबागचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला. त्यामुळे या तरुणाईचे कौतुक संपूर्ण अलिबागकर खुल्या मनाने करीत आहेत. अनेकांनी तरुणांच्या या स्वच्छता मोहिमेचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून कौतुक करीत धन्यवाद दिले आहेत.
- अलिबागच्या तरुणांनी समुद्र किनारी स्वच्छता केली. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. या कार्याच्या माध्यमातून या तरुणांनी दाखवून दिले की अलिबागकर योग्य मार्गावर आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे !!! – चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख