गड, किल्ले, समुद्रकिनार्यांवर येणार्या पर्यटकांवर राहणार नजर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येण्याची तयारी करू लागले आहे. 25 डिसेंबरपासून पर्यटक जिल्ह्यात दाखल होणार आहेत. आनंदोत्सव साजरा करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गड, किल्ले, समुद्रकिनारे, तलाव, नदी, धबधबा या पर्यटन स्थळी फिरण्यास येणार्या पर्यटकांवर प्रशासनची नजर राहणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठका घेऊन त्याचा आढावा घेण्यात आला आहे.
सरत्या 2024 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2025 या नुतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. वेगवेगळ्या हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरन्ट, फार्महाऊस 25 डिसेंबरपासून ते 2 जानेवारी 2025 पर्यंत बूकींग झाले आहे. 80 टक्केहून अधिक बुकींग झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल व रेस्टॉरन्टमध्ये सवलती सुरु केल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षण सजावटही करण्याची तयारी केली आहे. काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तयारीदेखील वेगाने सुरु आहे. समुद्रकिनारी, धबधबे, नदी, तलावांमध्ये फिरण्यास येणार्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत सर्व समुद्रकिनारी, गड किल्ले, धबधब या ठिकाणी सुचनाफलक लावाण्यात येणार आहेत. गड,किल्ले, धबधबे, समुद्र किनार्यांवर पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. शहरी व ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन स्थळी रुग्णवाहिका, बचाव साहित्य, रबरी बोट, लाईफ जॅकेट, जीवरक्षक, सुरक्षा गार्ड, गाईड आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गड किल्ल्यांवर जाणार्या मार्गावर वन व्यवस्थापन समितीमार्फत सुचना फलक लावले जाणार आहे. स्थानिक प्रशिक्षित गाईड उपलब्ध असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांना लाईफ जॅकेट, लाईफ बोयाज, टॉर्च रोपची व्यवस्था तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. अति उत्साही पर्यटकांमुळे काही दुर्घटना घडल्यास समुद्रकिनारी तात्काळ शोध व बचाव मोहिम हाती घेतली जाईल. नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत पर्यटनस्थळी घनकचरा व्यवस्थापनासाटी कार्यवाही केली जाणार आहे. त्या ठिकाणी स्वच्छता पथक, पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अनधिकृत सागरी खेळावर होणार कारवाई
समुद्रकिनारी फिरण्यास येणार्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घेण्याच्या सुचना ध्वनीक्षेपकाद्वारे नगरपरिषद व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. किनारी अनधिकृत वॉटरस्पोर्टस, ए.टी.व्ही. वाहने, पॅरासेलिंग, विविध वॉटर राईडस् आदी सागरी खेळ चालविणार्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांवर मनोरंजनासाठी चालणार्या विविध खेळ व उपक्रमांसाठी कुशल मनुष्यबळ, सुरक्षा साहित्य व परवानगी घेतली असल्याची पाहणी संबंधित विभागाद्वारे केली जाणार आहे.
याबाबत अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वेगवेगळ्या विभागातील अधिकार्यांची बैठका घेऊन सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन नाताळ बरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे.
सर्व विभागासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत
कोणत्याही अपघाताप्रसंगी आपल्या विभागाकडून तात्काळ सक्षम प्रतिसाद मिळेल, अशी व्यवस्था करावी. कोणत्याही अपघाताची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व नियंत्रण कक्षास सादर करावी, अशी सुचना देण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
शिस्तभंगाची होणार कारवाई
आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कराव्यात, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेवून शोध व बचाव पथके साहित्यांसह तत्पर ठेवावेत, सुरक्षेच्या उपाययोजनाअभावी घटना घडल्यास संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने तसेच नाताळ सणाच्या सुट्टीमुळे कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिध्द गड किल्ले, धबधबे, तलाव, नदी समुद्राकिनार्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यापूर्वी समुद्रामध्ये बुडून, धबधबे, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची संभाव्य जीवित हानी होऊ नये, यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरुन पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
– संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी