| पनवेल | प्रतिनिधी |
तळोज्यातील डोंगराचा पाडा येथे आयोजित आरोग्य शिबिरादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, शिबिरासाठी आलेल्या ग्रामस्थांना वैद्यकीय सेवांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मेणबत्तीच्या प्रकाशातही तपासण्या सुरू ठेवल्या. प्रतिकूल परिस्थितीतही शिबिराचे कामकाज सुरू ठेवत रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात आले.
या शिबिरात ग्रामस्थांची रक्तदाब, रक्तातील साखर आणि वजन तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. नियमित आरोग्य तपासणीची सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या भागांतील नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवानी अधाऊ, परिचारिका प्राजक्ता जाधव, सीमा जाधव, दक्ष तांडेल, महेश खैरे, सचिन श्रीवास्तव यांनी विशेष योगदान दिले. नीरज लाल यांनी, अनपेक्षित परिस्थितीतही नागरिकांना आरोग्यसेवा मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर नवी मुंबई केंद्राचे प्रमुख संदीप जोशी यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले. शिबिरामुळे गावातच आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.






