जेजुरीहून आलेल्या मेंढपाळांची व्यथा
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये विमानतळ, टोलेजंग इमारती आणि मोठमोठे रस्ते उभे राहात असताना पारंपरिक मेंढपाळी व्यवसाय मात्र अडचणीत सापडला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे मोकळी मैदाने आणि शेतजमिनी कमी झाल्याने मेंढ्यांना चारायचे कुठे, असा प्रश्न जेजुरीहून येणाऱ्या मेंढपाळांसमोर उभा राहिला आहे. ‘यंदा आलो, पण पुढच्या वर्षी पुन्हा यायचे की नाही?’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात भातशेतीची कामे संपल्यानंतर घाटमाथ्यावरील मेंढपाळ मेंढ्यांचे कळप घेऊन पनवेल परिसरात दाखल होतात. कापणीनंतर शेतात उरणारे गवत आणि मोकळ्या जमिनी यामुळे मेंढ्यांच्या चाऱ्याची सोय होत असे. मेंढ्यांच्या लेंडीपासून शेताला नैसर्गिक खत मिळत असल्याने शेतकरीही त्यांना सहकार्य करीत होते.
मात्र, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, औद्योगिक प्रकल्प, नवीन रस्ते आणि गृहसंकुलांच्या विस्तारामुळे शेतीचे क्षेत्र आणि मोकळ्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. परिणामी, मेंढ्यांना चराईसाठी जागा शोधताना मेंढपाळांची दमछाक होत आहे. वाढती वाहतूक आणि बांधकामांमुळे कळप घेऊन जाण्ोही कठीण बनले आहे.
‘पूर्वी गावोगावी शेतजमिनी आणि मोकळ्या जागा होत्या. शेतकरी मुक्कामासाठी जागा देत असल्याने चाऱ्याची अडचण येत नव्हती. आता सर्वत्र इमारती आणि रस्ते दिसतात. यंदा आलो आहोत; मात्र पुढच्या वर्षी यायचे की नाही, याचा विचार करावा लागणार आहे,’ अशी व्यथा मेंढपाळांनी मांडली.






