पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण; जलजीवन योजना, ग्रामपंचायत इमारत अपूर्ण
| आपटा | प्रतिनिधी |
एकीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, तर दुसरीकडे कोट्यवधींची जलजीवन योजना रखडलेली आणि ग्रामपंचायतीची इमारतही अपूर्णावस्थेत आहे. आपटा गावातील विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावाचा विकास कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
आपटा गावात सध्या अवघा 35 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी दररोज एक तास पाणी मिळत होते. त्यानंतर हा कालावधी 45 मिनिटांवर आला आणि आता केवळ 35 मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. हेटवणे पाणीपुरवठा योजनेचा पुरवठा दररोज पाच तास बंद ठेवला जात असल्याने गावाला मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, नागरिकांकडून बिले भरली जात नसल्याचीही समस्या आहे. गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठ्या क्षमतेची नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी होत आहे.
दीड कोटींची जलजीवन योजना रखडली
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत 2022-23 मध्ये आपटा गावासाठी सुमारे 1 कोटी 52 लाख 19 हजार 786 रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. कामाची ऑर्डर आणि करारनामा क्रमांक 231/2022-23 नुसार कामालाही सुरुवात झाली. गावात नळजोडणीची कामे करण्यात आली; मात्र अद्याप साठवण टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. मुख्य ठेकेदार आणि पोटठेकेदार यांच्या माध्यमातून काम सुरू असताना आता निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत काम बंद ठेवण्यात आले आहे. कोट्यवधींची योजना असूनही ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत इमारतही धूळखात
गावातील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. इमारतीसाठी निवडलेली जागा पूररेषेत असल्याचा आक्षेप असून, आराखडाही चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत ग्रामसभेत विषय मांडूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक निधी खर्च होऊनही ग्रामपंचायतीची इमारत अपूर्णच राहिली आहे.
बीडीओंनी लक्ष घालण्याची मागणी
गावातील विकासकामांची अवस्था पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांनाही अद्याप सुरुवात झालेली नसल्याची तक्रार आहे. ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) आपटा गावातील सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा दर्जा आणि विलंबाची कारणे तपासावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.






