| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा येथील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता नालासोपाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा येथून पीटर हरमन असेंगा (55) या आफ्रिकी नागरिकाला अटक केली आहे. या अटकेमुळे प्रकरणातील आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.
तळोजा येथील रोहिंजन परिसरात काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई करून एका नायजेरियन नागरिकाला कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक केली होती. त्यानंतर आरोपींच्या संपर्कसाखळीचा तपास करत पोलिसांनी दिवा-मुंब्रा परिसरातून आणखी दोन आफ्रिकी नागरिकांना अटक केली. पुढील तपासात या तस्करीत सहभागी असलेल्या आणखी चार आरोपींना विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा माग काढताना पोलिसांनी नालासोपारा येथे छापा टाकून पीटर हरमन असेंगा याला अटक केली. या प्रकरणातील अमली पदार्थांच्या पुरवठ्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये किमतीचे दोन किलो 18 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि 316.5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. पुढील कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचा एकूण साठा पाच किलो एमडी आणि 800 ग्रॅम कोकेनपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




