कोलेटी येथील प्रियकरावर गुन्हा दाखल
। नागोठणे । प्रतिनिधी ।
शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका 31 वर्षीय पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर शैलेश होनाजी भोईर (रा. कोलेटी, ता. पेण, जि. रायगड) याच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी शैलेश भोईर यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे जून 2026पासून खारढोंबी परिसरात भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. या काळात त्यांच्यात वारंवार वाद होत असत. आरोपी शैलेश हा पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करीत असे. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून 17 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नागोठणे ते वडखळ प्रवासादरम्यान निडी गावाच्या हद्दीत रिक्षामध्ये पीडित तरुणीने विष प्राशन केले. त्यानंतर तिला पेण येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान 19 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार शैलेश भोईर याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.





