अल निनोचा पाणीपुरवठ्याला फटका
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 या आर्थिक वर्षातील पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार सोमवार, दि. 23 नोव्हेंबर 2026 पासून पनवेल शहरातील विविध उच्च जलकुंभांशी संबंधित भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजीच्या निर्णयानुसार तसेच धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जलकुंभांमधून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी मार्केट यार्ड उच्च जलकुंभ, भाजी मार्केट उच्च जलकुंभ आणि चोकाणी टाकी येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. मंगळवारी पटेल मोहल्ला आणि पायोनियर उच्च जलकुंभांशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी एचओसी उच्च जलकुंभ, तर गुरुवारी ठाणा नाका उच्च जलकुंभाशी संबंधित साईनगर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवारी गोल टाकी येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी भाग 1 व 2 आणि एस. के. बजाज परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील.शनिवारी गंगाराम सिनेमा उच्च जलकुंभाशी संबंधित टक्का गाव व कॉलनी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील. तर रविवारी शहरातील सर्व भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी वितरणाच्या वेळेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येऊ शकतो, असे पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






