| नागोठणे | प्रतिनिधी |
बालविवाहामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे परिसरात कुठेही अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास ते तातडीने रोखण्यासाठी प्रयत्न करा. बालविवाह पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिसांचे शंभर टक्के प्रयत्न राहतील, अशी ग्वाही रोह्याचे पोलीस उपअधीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिली. बालहक्क सप्ताहानिमित्त सोमवारी (दि. 23) नागोठणे पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
प्रत्येक बालकाला शिक्षणासह मूलभूत हक्क आणि आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. बालकांवरील अत्याचारांच्या घटनांची माहितीही तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन गोकुळे यांनी केले. यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बालविवाहाची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील. त्यामुळे अशी घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना किंवा 1098 आणि 112 या हेल्पलाइन क्रमांकांवर माहिती द्यावी. आपल्या परिसरात बालविवाह होऊ देणार नाही, अशी शपथही प्रत्येकाने घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी पळस आदिवासी वाडीत जनजागृती कार्यक्रम घेण्याची सूचना केली. आदिवासी वाड्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याने नागोठणे परिसरातील सर्व वाड्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने जनजागृती करण्याचे बैठकीत ठरले. आगामी दत्तजयंती उत्सव आणि वर्षअखेरीस होणाऱ्या कार्यक्रमांबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. सण-उत्सव शांततापूर्वक साजरे करण्याचे आवाहन केले. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते अकबर पठाण, आसिफ मुल्ला, ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, पूनम काळे, महिला दक्षता समितीच्या निलोफर पानसरे, राजश्री टके, अपर्णा सुटे, संगीता पोलसानी, मंजुळा म्हात्रे, पोलिस कर्मचारी स्वप्निल भालेराव, हरेश धामणे, मनोज वाघमारे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि पत्रकार उपस्थित होते.






