| महाड | प्रतिनिधी |
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेमधून प्रवास करताना पडल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील कावळे गावाच्या हद्दीत घडली. दीपक रहाटे (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रहाटे हा दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करत असताना कावळे गावाजवळ अचानक रेल्वेतून खाली पडला. जवळून दुसरी रेल्वे जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाडचे पोलीस निरीक्षक अभिजित नेवासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. महाशक्ती ॲम्ब्युलन्सचे अनिल चव्हाण यांच्या मदतीने रेल्वे रुळ ओलांडून मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.







