धाटावमध्ये वनविभागाची धडक कारवाई; दोघांना अटक, एक किलो उलटी जप्त
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रोहा वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अंदाजे एक किलो व्हेल माशाची उलटी, दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
23 नोव्हेंबर रोजी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र रोहा अंतर्गत धाटाव एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अमन अनंत जाधव (24) मूळ रा. मुचणे बौद्धवाडी, सध्या भुवनेश्वर, ता. रोहा आणि समीर हरिश्चंद्र सातपुते (44) रा. शेणवई, ता. रोहा, जि. रायगड यांना अटक करण्यात आली.
कारवाईत अंदाजे एक किलो व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. तसेच तस्करीसाठी वापरल्याचा संशय असलेल्या दोन दुचाकी (किंमत अंदाजे 80 हजार रुपये) आणि चार मोबाईल फोन (किंमत सुमारे एक लाख रुपये) हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डॉ. शैलेंद्रकुमार जाधव (भा.व.से.), उपवनसंरक्षक, रोहा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्र दबडे, वनपाल पी.व्ही. शिंदे, वनपाल गोरक्षनाथ दहिफळे आणि अधीनस्थ वनरक्षकांच्या पथकाने केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्र दबडे करीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा प्रकार उघड झाल्याने रोहा तालुक्यात खळबळ उडाली आहे.






