पाच महिन्यानंतरही मदतीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू कायम
| माणगाव | प्रतिनिधी |
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांच्या जखमेवर आता प्रशासकीय दिरंगाईची भर पडली आहे. एप्रिल महिन्यातील प्रतिकूल हवामानामुळे आंबा उत्पादनाचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली; मात्र पाच महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा झालेली नाही. माणगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी तसेच विविध कागदपत्रांमधील त्रुटींमुळे नुकसान भरपाईची रक्कम अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटातून सावरण्याची आशा बाळगणाऱ्या बागायतदारांना आता शासकीय प्रक्रियेच्या फेऱ्यांत अडकून राहावे लागत आहे. नुकसान झाले शेतकऱ्यांचे, मदत जाहीर झाली शासनाकडून; पण प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी मात्र शेतकऱ्यांनाच कागदपत्रांची धावपळ करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आंबा उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घरखर्च, बागेची मशागत, खते, कीटकनाशके, औषध फवारणी, मजुरी आणि पुढील हंगामाची तयारी अवलंबून असते. मात्र एप्रिल महिन्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे रायगडसह संपूर्ण कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला. अनेक बागांमधील अपेक्षित उत्पादन हातचे गेले. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मदतीची घोषणा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.
माणगाव तालुक्यात सुमारे 950 हून अधिक आंबा बागायतदार असून 485 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड असल्याचे सांगण्यात येते. शासनाच्या निकषांनुसार झाडांची संख्या विचारात घेऊन नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. एका झाडामागे 250 रुपये या दराने प्रतिहेक्टर सुमारे 22 हजार 500 रुपयांची मदत निश्चित करण्यात आल्याचे समजते. मात्र तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि विविध कागदपत्रांतील त्रुटींमुळे मदत रखडल्याने या शेतकऱ्या समोर आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. विशेष म्हणजे, मदतीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या त्रुटींची पूर्तता करायची, त्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा आणि भरपाई कधी मिळणार, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. आंबा बागेच्या वर्षभराच्या देखभाली साठी मोठा खर्च करावा लागतो. खते, औषधे, फवारणी, छाटणी आणि मजुरी यासाठी हजारो रुपये खर्च होतात. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनच हातचे गेले असताना झाडामागे 250 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकष अत्यंत अपुरा असल्याची भावना बागायतदारांमध्ये आहे.
एका आंब्याच्या झाडापासून साधारण 40 ते 45 डझन पर्यंत उत्पादन मिळते. बाजारातील दर आणि उत्पादनाचा विचार करता झाडामागे 250 रुपये मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत हास्यास्पद असून, तीदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाने शेतकऱ्यांची अशी थट्टा करू नये.
– दत्तूशेठ पवार, ज्येष्ठ आंबा बागायतदार






