मच्छी विक्रेत्यांचा पुन्हा ठिय्या; रिकाम्या टोपल्या जप्त करुन कर्मचाऱ्यांची पाठ
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे येथील सेक्टर 6 परिसरातील एम एन आर स्कूलच्या प्रवेशद्वारालगत रस्त्यावर टोपल्या ठेवून सुरू असलेल्या मच्छी विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. मात्र, या कारवाईतून मच्छी विक्री पूर्णपणे बंद झाली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या कारवाईची चाहूल लागताच मच्छी विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेली मच्छी जवळच उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाखाली फेकून दिली. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ रिकाम्या टोपल्या ताब्यात घेतल्या आणि तेथून काढता पाय घेतला.
महापालिकेची कारवाई करणारी गाडी निघून गेल्यानंतर विक्रेत्यांनी चारचाकी वाहनाखाली फेकलेली मच्छी पुन्हा गोळा केली. त्यानंतर जवळच लपवून ठेवलेल्या टोपल्यांमधून पुन्हा मच्छी विक्री सुरू करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा नेमका परिणाम काय झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमएनआर स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याच्या कडेला बसून काही विक्रेते मच्छी विक्री करीत आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांना याच परिसरातून ये-जा करावी लागते. मच्छी विक्रीदरम्यान निर्माण होणारी दुर्गंधी, उघड्यावर ठेवलेली मच्छी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, शाळेपासून 100 मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासंबंधी न्यायालयीन निर्बंध आहेत. त्यामुळे या ठिकाणचे प्रत्यक्ष अंतर मोजून संबंधित विक्रेत्यांच्या व्यवसायाची वैधता तपासण्याची गरज आहे.
कारवाई केवळ टोपल्यांपुरतीच का?
महापालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी येणार असल्याची माहिती मिळताच विक्रेत्यांनी मच्छी लपवून कारवाई टाळल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे केवळ रिकाम्या टोपल्या ताब्यात घेऊन अतिक्रमण हटविल्याचा देखावा निर्माण होत असेल, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ शकतो. संबंधित ठिकाणी पुन्हा विक्री सुरू होऊ नये यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिकेने स्पष्ट करावे!
शाळेच्या प्रवेशद्वारालगत मच्छी विक्रीसाठी परवानगी आहे का? संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत का? कारवाईदरम्यान मच्छी जप्त का करण्यात आली नाही? कारवाईनंतर पुन्हा विक्री सुरू होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना करण्यात येणार आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि बाजार परवाना विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.
विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची घटनास्थळापासून दूर नेऊन विल्हेवाट लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढे अशा प्रकारे अनधिकृत विक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दशरथ भंडारी,
प्रभाग अधीक्षक






