| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सेटेलाईट कंपनीच्या उंच टॉवरवर देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी तोल जाऊन, वरून खाली पडून कामगार गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी वरसोली येथे घडली. या घटनेने कामगार सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावले ठेकेदाराकडून उचलली नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप काही स्थानिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन तोतीराम राठोड (42) असे या मृत कामगाराचे नाव आहे. हा कामगार रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील रसायनीमधील मोहपाडा येथील रहिवासी होता. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील नाईक प्लॉटमधील भूम कॉटेजच्या बाजूला सुयोग टेलिमेटिक प्रा. लि. यु. एच. एफ सेटेलाईट कंपनीचे उंच टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरवर चढून गजानन राठोड हे देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. काम करीत असताना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कामगाराचा तोल गेल्याने तो खाली जमीनीवर पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. ही बाब तेथील काही मंडळीच्या लक्षात आल्यावर त्याला बेशुध्द अवस्थेत अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ते अगोदरच मृत झाल्याचे घोषित केले. उपचारापुर्वीच कामगार राठोड यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आली आहे. कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याने कामगारांचा जीव गेल्याची प्रतिक्रीया स्थानिक पातळीवर चर्चेतून होत आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अमोल चौधरी यांनी तक्रार नोंदविली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे अधिक तपास करीत आहेत.






