केमिकलयुक्त सांडपाण्याचा प्रादुर्भाव
| उरण | प्रतिनिधी |
दिघोडे खाडीत केमिकलचे पाणी सोडण्यात आल्यामुळे या खाडीतील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिघोडे खाडीत केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक तथा कोळी बांधवांनकडून करण्यात येत आहे.
उरणमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प, कंटेनर यार्ड, गोदामे उभी राहिली आहेत. मात्र, या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसून, परप्रांतीय नागरिकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत येथील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली जात आहे. तसेच, पारंपरिक मासेमारी, शेती हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या औद्योगिक क्षेत्रामुळे जवळपास दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. मागील काही वर्षांपासून स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे खोपटा-दिघोडा-वेश्वी खाडीमध्ये घातक रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याने खाडीमध्ये मच्छिमारी हा व्यवसाय कायमचा बंद होत चालला आहे.
उरणमधील वेश्वी व दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील गोदाम व्यवस्थापकांनी केमिकलमिश्रित विषारी रासायनिक पदार्थ मागील दोन दिवसांपासून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता खाडीत सोडण्याचे काम हे शासनाच्या नियमांची पायमल्ली करून सुरू केले आहे. त्यामुळे खाडीतील जिताडा, चिंबोरे, कोलंबी, फणटूस, बोईट माशा सह इतर मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याने उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती दिघोडे येथील संतोष शेटे, किशोर कोळी, गंगाराम कोळी, गणेश कोळी, समाधान कासकर, दत्ता कोळी या मासेमारी करणाऱ्या बांधवांनी दिली आहे. तरी केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्या बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.







