रायगडात भाजप-शिंदेसेना वाद विकोपाला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भाजपचे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील भाजपच्यावतीने शिंदे गटातील राजा केणी यांच्याविरोधात अलिबागमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यांनी अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत त्यांनी राजा केणी यांची प्रतिमा व फलक फाडून घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर राजा केणी यांचा बॅनर पायाने तुडवण्यात आला. या प्रकारामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत वाद अधिक पेटल्याचे चित्र आहे.
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये महायुती आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरु आहेत. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना वाद जगजाहीर असतानाच भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पेणमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात सामावून घेतल्याबद्दल भाजपचे जिल्हा चिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी शिंदे गट शिवसेनेच्या कारभाराबाबत तीव्र निषेध सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. त्यानंतर आगामी काळात अलिबाग विधानसभा आमदारकीचे स्वप्न आजपासून विसरून जा, असा त्यांनी इशारा दिला. या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोहिते यांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेवर चपलांचा मारा केला. दरम्यान, एका सभेत राजा केणी यांनी मोहिते यांना परप्रांतिय बोलले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांचा वाद पेटला असून, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजा केणी यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी राजा केणी यांना ‘परप्रांतियाचा अर्थ कळत नसणारा गाढव’ अशी उपासात्मक टीका करीत त्यांचे चित्र काढलेले बॅनरला पायाने तुडवले. यावेळी भाजपचे संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, अशोक वारगे, स्वप्नील गाडे, मानसी मोहिते, रोशन भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना टोला
शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी यांच्याकडून झालेला प्रकार निंदनीय आहे. सत्तेत असतानाही एकमेकांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे नामुष्की आणणारी आणि नेतेमंडळींना न शोभणारी गोष्ट आहे. परंतु, युतीत आणि सत्तेत असताना वरच्या नेत्यांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे. भाजपच्यावतीने त्यांचा निषेध व्यक्त केला जात असून, सत्तेच्या लालसेपोटी प्रथम स्वतः बाकीचे नंतर अशा वृत्तीचे लोक भाजपच्या वरचढणीला आले आहेत, म्हणून असे प्रकार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच, जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी नको त्या गोष्टी केल्या जात असल्याचा टोला भाजपकडून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
भाजपकडून इशारा
भाजप आणि नेते मंडळी यांच्याविरोधात शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे वक्तव्य आणि टीका केली, बहारदर कार्यकर्ता रस्त्यावर येऊन त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. आजच्या मोर्चा ही तर झाकी आहे, अजून बऱ्याचश गोष्टी बाकी आहेत, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.






