माथेरान नगरपरिषदेच्या परवानग्यांवर संशय
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील माथेरानमध्ये किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली नवीन बांधकामे आणि हेरिटेज वास्तूंचे नूतनीकरण सुरू असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. माथेरान सनियंत्रण समितीला डावलून नगरपरिषदेने दिलेल्या दुरुस्ती परवानग्यांमधील अटींची पूर्तता दर्शविणारे मूळ अभिलेखच कार्यालयात उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दिगंबर रामचंद्र चंदने यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 28 जुलै 2026 रोजी माहिती अधिकारांतर्गत डिसेंबर 2023 पासून एमपी आणि बीपी भूखंडांवर दिलेल्या किरकोळ दुरुस्ती परवानग्यांची माहिती मागितली होती. हेरिटेज समितीची मंजुरी, स्ट्रक्चरल ऑडिट, स्थळपाहणी अहवाल, कामापूर्वी व कामानंतरची छायाचित्रे आणि काम पूर्णत्वाचे दाखले यांचीही मागणी केली होती.
नगरपरिषदेने 10 ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरात काही परवानग्यांच्या प्रती दिल्या; मात्र महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयीन अभिलेखात उपलब्ध नसल्याचे कळविल्याचा चंदने यांचा दावा आहे. परवानगीपत्रांमध्ये या कागदपत्रांच्या अटी नमूद असताना त्यांची पूर्तता झाल्याचे पुरावे कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या तक्रारीनंतर जिल्हा सहआयुक्तांनी 3 नोव्हेंबर रोजी प्रकरण माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविले. नियमोचित चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह पूर्तता अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणती कामे झाली? हेरिटेज समितीची मंजुरी घेतली होती का? स्ट्रक्चरल ऑडिट आणि स्थळपाहणी कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून समोर येणार आहेत.
पाच मालमत्तांवर संशयाची सुई
चंदने यांनी गार्डन रिसॉर्ट (भूखंड 135), सेक्रेटरी ऑफ मर्चंट नेव्ही (104), केकी लॉज (147), एल्फिन्स्टन लॉज (41) आणि कच्छ कॅसल (05) या मालमत्तांच्या परवानग्यांवर आक्षेप घेतला आहे. आवश्यक मंजुरी आणि तपासणीचे मूळ अभिलेख उपलब्ध नसल्याचा त्यांचा दावा आहे.
चौकशीचा निकाल काय?
माथेरानचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम नियमांचे पालन आवश्यक आहे. आता चौकशीत अभिलेखांची उपलब्धता, परवानग्यांची वैधता आणि कथित अनियमितता स्पष्ट होणार का, याकडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.
परवानगीपत्रांमध्ये हेरिटेज मंजुरी, स्ट्रक्चरल ऑडिट आणि छायाचित्रांच्या अटी आहेत; मात्र त्यांची पूर्तता दर्शविणारे अभिलेख मिळत नाहीत. या परवानग्यांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
दिगंबर चंदने,
तक्रारदार






