| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या वाहनाचे ठिकाण ताम्हिणी घाट परिसरात आढळल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी घाटातील सुमारे 1200 फूट खोल दरीत त्यांचे वाहन आढळून आले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
श्रीनिवास बेंडखले हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, त्यांच्या वाहनाचे ठिकाण ताम्हिणी घाटात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध आणि बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. ताम्हिणी घाटातील खोल दरी आणि दुर्गम परिसरामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. स्वयंसेवी बचाव पथक आणि शेलारमामा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा सुमारे 1200 फूट खोल दरीतून श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे गोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेंडखळे यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताबाबत पौड पोलीस पुढील तपास करीत आहेत.





