हक्काचा रस्ता मागणाऱ्या सावळे ग्रामस्थांवर गुन्हे; ट्रॅक्टर अंगावर घातल्याची तक्रार बेदखल
| नेरळ | प्रतिनिधी |
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी गावाचा रस्ता खोदला, दौरा रद्द झाल्यानंतर रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी झटकली आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. टोरंटपुढे पोलीस यंत्रणा लाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारण, कंपनीच्या कामाला प्रशासनाचे संरक्षण, मात्र स्थानिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांच्या वाट्याला पोलिसी कारवाई, असा संतापजनक प्रकार सावळे गावात समोर आला आहे.
ट्रॅक्टर अंगावर घातल्याचा आरोप करणाऱ्या तरुणांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी डंपरवरील दगडफेकीच्या प्रकरणात ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने कर्जत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीच्या कामासाठी प्रशासन तत्पर आणि न्याय मागणाऱ्या जनतेसाठी मात्र कायद्याचा बडगा, असा हा कारभार आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
कर्जत तालुक्यातील लाखाचीवाडी येथे टोरंट कंपनीला महाराष्ट्र शासनाने 96 एकर जमीन भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत-मुरबाड मार्गावरील सावळे फाट्यापासून गावाकडे जाणारा रस्ता खोदून नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, पंतप्रधानांचा दौरा झाला नाही आणि रस्त्याचे कामही अर्धवट सोडण्यात आले. परिणामी, सावळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता पूर्ववत करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली असता निधी नसल्याचे कारण देत काम करण्यास नकार देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावाचा रस्ता खोदून ठेवल्याने संतप्त झालेल्या सावळे ग्रामस्थांनी लाखाचीवाडी येथील टोरंट कंपनीच्या कामाच्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्याची दुरुस्ती करा आणि सुरू असलेले खोदकाम व सपाटीकरण थांबवा, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी एका ट्रॅक्टरचा टायर गावातील दोन तरुणांच्या अंगावर घालण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रसंगावधान राखत या तरुणांनी आपल्या दुचाकी बाजूला टाकून जीव वाचवला. या प्रकारानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि ट्रॅक्टरचालकाला मारहाण झाल्याचे सांगण्यात येते.
मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर ग्रामस्थांचा आक्षेप आहे. ट्रॅक्टर अंगावर घातल्याचा आरोप करणाऱ्या दोन्ही तरुणांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे डंपरवरील दगडफेकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांची कारवाई एकतर्फी असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी भिवपुरी येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात राहतात. ते डंपर क्रमांक एमएच 01 ईडब्ल्यू 4803 मध्ये माती भरून पुलाचीवाडी येथे टोरंट कंपनीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी उभे होते. त्यावेळी दुचाकींवरून आलेल्या 10 ते 12 अनोळखी व्यक्तींपैकी तिघांनी डंपरवर दगडफेक केली. यातील तीन दगड फिर्यादीच्या छातीवर, पोटाजवळ आणि मांडीवर लागल्याने ते जखमी झाले. तसेच डंपरच्या काचांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण नवले पुढील तपास करीत आहेत.
मात्र, डंपरवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करताना त्याच ठिकाणी ट्रॅक्टर अंगावर घालण्यात आल्याच्या आरोपाचीही निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आणि तक्रारींची नोंद करणे ही पोलिसांची जबाबदारी असताना स्थानिक तरुणांना ती संधी का मिळाली नाही? सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यासाठी निधी नाही, प्रशासनाकडे ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही आणि पोलिसांकडे स्थानिकांची तक्रार ऐकण्यासाठी तयारी नाही, अशी परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कुणाकडे? टोरंट प्रकल्पाच्या निमित्ताने सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आता ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.






