कोकणी निसर्गसौंदर्याने पर्यटक मंत्रमुग्ध; स्थानिक अर्थकारणालाही नवी उभारी
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटनाचा अक्षरशः उत्सव रंगला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विविध शहरांमधील पर्यटकांनी या निसर्गरम्य किनाऱ्याकडे धाव घेतल्याने समुद्रकिनारा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. समुद्राच्या लाटांचा नाद, मुलांचा किलबिलाट, पर्यटकांचा जल्लोष आणि कोकणी पाहुणचार यामुळे रेवदंड्यात चैतन्याचे उधाण आले आहे.
रेवदंडा हे केवळ पर्यटनस्थळ नसुन, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा ठेवा जपणारी भूमी आहे. पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक रेवदंडा किल्ल्याची भक्कम तटबंदी, तिच्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्यालगत पसरलेल्या नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी रेवदंडा किनाऱ्याचे रूप अधिकच खुलून दिसते. क्षितिजाकडे हळूहळू झुकणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणे समुद्राच्या पाण्यावर पसरतात. त्या प्रकाशात डोलणाऱ्या मासेमारीच्या आणि इतर बोटींचे दृश्य एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे भासते. गुलाबी थंडीची हलकी झुळूक, लाटांचा अखंड गजर आणि आकाशात बदलणारे रंग पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच किनाऱ्याकडे वळतात. अनेकजण मोबाईलमध्ये हे निसर्गचित्र टिपताना दिसतात, तर काहीजण समुद्रकिनाऱ्यावर निवांत क्षण अनुभवण्यात रमून जातात.
रेवदंडा किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी समुद्रसौंदर्याबरोबरच जलक्रीडांचे आकर्षणही मोठे ठरत आहे. पॅरासेलिंग, जेट स्की आणि बनाना बोट राइड्ससारख्या साहसी जलक्रीडांचा आनंद घेताना तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे. लाटांवर स्वार होण्याचा थरार अनुभवत पर्यटक आपल्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करत आहेत. मात्र, रेवदंड्याची खरी लज्जत केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित नाही. स्थानिक खानावळी आणि घरगुती निवास व्यवस्थांमध्ये मिळणारे ताजे मासळीचे झणझणीत कालवण, कुरकुरीत तळलेली सुरमई-पापलेट, कोळंबीचे विविध पदार्थ, तांदळाची भाकरी आणि थंडगार सोलकढी यांची चव पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळते. त्यामुळे कोकणी माणसाचा आपुलकीचा पाहुणचार आणि घरगुती जेवणाची चव पर्यटकांना पुन्हा पुन्हा रेवदंड्याकडे खेचणारी ठरत आहे.
स्थानिकांच्या चेहऱ्यावर समाधान
पर्यटनाच्या वाढत्या ओघाचा थेट फायदा स्थानिक अर्थकारणाला होत आहे. हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, रिक्षाचालक, स्थानिक विक्रेते, जलक्रीडा व्यावसायिक आणि घरगुती निवास व्यवस्था चालवणाऱ्या कुटुंबांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी कोकणी माणूस सज्ज झाला असून, त्यांच्या आगमनाने स्थानिक बाजारपेठेला आर्थिक बळ मिळत असल्याने स्थानिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
मोठे पर्यटनस्थळ होण्याची संधी
रेवदंड्याचे निसर्गसौंदर्य आणि पर्यटनक्षमता पाहता भविष्यात या किनाऱ्याला मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची संधी आहे. मात्र, वाढत्या पर्यटकांच्या गर्दीबरोबरच स्वच्छता, वाहनतळ, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षितता या मूलभूत सुविधांकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे किनाऱ्यावर कचरा साचणार नाही, समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप होणार नाही, याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने आणि पर्यटकांनीही घ्यायला हवी.






