प्रकल्प रद्द करण्यासाठी हजारोंच्या सह्यांचा लढा; सर्वपक्षीय नेते, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक रस्त्यावर
| नेरळ | प्रतिनिधी |
सायडोंगरातील हजारो झाडांची कत्तल, धरणांच्या नावाखाली जंगलांवर घाव आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास… या सगळ्याविरोधात आता संपूर्ण कर्जत तालुका एकवटला आहे. टोरंटचा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कर्जत पर्यावरण बचाव समितीने रविवारी दि. 22 पुकारलेल्या सह्यांच्या मोहिमेला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधातील लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले आहे.
कर्जत येथील कपालेश्वर मंदिर परिसरात आयोजित या सह्यांच्या मोहिमेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. टोरंट प्रकल्प परिसरासह प्रस्तावित पोशीर, शिलार आणि टाटा धरण परिसरातील नागरिकांनीही मोहिमेत सहभाग घेतला. टोरंट प्रकल्पासाठी पाली-सायडोंगर परिसरात हजारो झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. केवळ एका प्रकल्पापुरता हा लढा मर्यादित नसून, कर्जत तालुक्यातील पर्यावरण उद्ध्वस्त करणारे सर्व प्रकल्प रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

या मोहिमेत कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मनसेचे जितेंद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय गवळी यांच्यासह धर्मेंद्र मोरे, प्रशांत उगले, रंजन दातार, प्रवीण गांगल, सतीश मुसळे, विद्या वनगे, स्वीटी बार्शी, विजय बेडेकर, महेंद्र भोईर, लोकेश यादव, प्रशांत सदावर्ते, अतुल पवार, मुकेश शाह, विजय मांडे, अविनाश भोईर आणि रामचंद्र खरमरे आदी उपस्थित होते.
आता माघार नाही!
आमच्या आंदोलनामुळे आतापर्यंत दोन विजय मिळाले आहेत. धरणासाठी सुरू झालेली जंगलतोड थांबली, तर जनतेच्या रेट्यामुळे पोशीर रस्त्याची संयुक्त मोजणीही रद्द करावी लागली. आता टोरंट प्रकल्प सरकार कधी रद्द करणार, याची आम्ही वाट पाहात आहोत. सह्यांच्या मोहिमेतून जमा होणारे निवेदन सरकारला देणार असल्याचे कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे सांगितले.
कर्जतच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आम्ही पर्यावरण बचाव समितीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून कर्जतच्या भवितव्याचा आहे.
राजेश लाड,
माजी नगराध्यक्ष
संतोष पाटील,
शिवसेना ठाकरे पक्षाने सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन जंगलतोड रोखण्यासाठी पुढाकार घेतला. आता हा प्रकल्प रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
उपनगराध्यक्ष
कर्जत तालुक्यात येणारे सर्व पर्यावरणविघातक प्रकल्प रद्द झाले पाहिजेत. येथील निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत.
प्रमिला बोराडे,
माजी सरपंच






