लाखो भाविकांनी घेतले नागेश्वराचे दर्शन; बैलगाड्यांसह आलेल्या शेतकऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आवास येथील श्री नागोबा देवस्थानाच्या दोन दिवसीय यात्रेला यंदा लाखो भाविकांनी गर्दी केली. कार्तिक वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने रविवारी (दि.23) या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत शेतकरी आणि कोळी बांधवांसह समाजातील सर्व स्तरांतील भाविकांच्या गर्दीमुळे श्री नागेश्वर मंदिर परिसरात दोन दिवस भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी आवास येथील श्री नागोबा मंदीरात आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पहाटे 3 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे श्री नागेश्वर मंदिर परिसरात यात्रेच्या दोन दिवसांत भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. या यात्रेत अलिबाग तालुक्यासह उरण, करंजा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे, दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेसाठी बैलगाड्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. अलिबाग एसटी आगाराच्यावतीने भाविकांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच, उरण ते करंजा मार्गावरही वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर दुचाकी, तीनचाकी आणि खासगी वाहनांतूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मिठाई, खाद्यपदार्थ, लहान मुलांची खेळणी, कौटुंबिक वापराच्या वस्तूंची विविध दुकाने थाटण्यात आली होती. आकाशपाळणे आणि मनोरंजनाच्या विविध खेळांनी यात्रेची रंगत वाढवली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच यात्रेचा आनंद घेतला. त्याचबरोबर यात्रेतील एक महत्त्वाचे आकर्षण असणारे रात्री 10 वाजल्यानंतर नागोबा मंदिरात खेळले जाणारे पारंपरिक गण हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रेदरम्यान ग्रामपंचायत आवासच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या यात्रेच्या नियोजनासाठी सरपंच अभिलाषा राणे, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. माजी सरपंच अभिजीत राणे आणि माजी पंचायत समिती सदस्य रणजित राणे यांनीही ग्रामपंचायतीच्यावतीने भाविकांचे स्वागत केले. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.






