अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

पुणे

। पुणे । वृत्तसंस्था ।

 दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी हे चक्रीवादळ पोषक स्थिती निर्माण करू शकते. मात्र, त्याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठा धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.

मोसमी वारे यंदा 1 जूनला नियोजित वेळेतच भारतात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला होता. पावसाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देशात 98 टक्के म्हणजे समाधानकारक पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मोसमी वार्‍यांचे आगमन आता सुमारे तीन आठवडयांवर आले आहे. याच काळात मोसमी वार्‍यांना प्रवाहीत करणारी पोषक स्थिती अरबी समुद्रात निर्माण होत आहे.

दक्षिण-पूर्व  अरबी समुद्रात चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असून, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 14 मेपासून ही स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 15 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन 16 ते 17 मे रोजी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रातील किनारपट्टीवर मोठा परिणाम होणार नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच काळातमध्ये अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

संख्यात्मक प्रारुपाच्या पूर्वानुमानुसार 14 मे रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. पुढे ते तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते ओमानकडे जाणार आहे. या चक्रीवादळामुळे मोसमी वारे प्रगती करू शकतात. मात्र, सुरुवातीच्या प्रगतीनंतर खंडही पडू शकतो. शेतीसाठी सुरुवातीला पेरणीसाठीचा आणि पेरणीनंतरचा पाऊसही महत्त्वाचा असतो. त्यामुळे चक्रीवादळाच्या स्थितीकडे नजर ठेवावी लागेल.

Exit mobile version