अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

बालकांस जेष्ठांची मोफत आरोग्य तपासणी; ॲड. मानसी म्हात्रे यांची संकल्पना

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग शहराच्या आरोग्याचा विचार केवळ आजारपणानंतरच्या उपचारांपुरता मर्यादित न ठेवता, चिमुकल्यांच्या आरोग्याची पायाभरणी करण्यापासून ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत संपूर्ण ‌‘लाईफ सायकल’चा विचार अलिबाग नगरपरिषदेने पुढे आणला आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी 250 पालकांनी आपल्या मुलांना तपासणीसाठी आणले, तर ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरात 37 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. हा उपक्रम अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

यावेळी बालकांसाठी ब्राह्मण आळी येथील यूएचडब्ल्यूसी, शास्त्रीनगर येथील यूएचडब्ल्यूसी तसेच कन्या शाळेसमोरील यूएचडब्ल्यूसी येथे आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये डॉ. विनायक पाटील, डॉ. सागर खेदू, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. मैत्रयी तिवारी, डॉ. सरोदे, आणि डॉ. मनोज कोळी यांनी वैद्यकीय सेवा दिली. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिबाग येथील ज्येष्ठ नागरिक भवनात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. मंजिरी इंगळे, डॉ. श्रेयस नाईक, डॉ. वैभव चौलकर आणि डॉ. सचिन जायभाय यांनी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. यावेळी नगरसेविका शैला भगत, स्वीकृत नगरसेवक जमाल सय्यद, आरोग्य विभाग प्रमुख प्रियांका मोरे, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, मुकादम प्रकाश तांबे, अक्षय गायकवाड तसेच संपूर्ण आरोग्य विभाग व अलिबाग नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. मानसी म्हात्रे यांनी, “अलिबागकरांचे आरोग्य सुदृढ आणि चांगले राहिले पाहिजे, या उद्देशाने आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. तसेच, आरोग्य शिबिरांसोबतच शहर स्वच्छ आणि रोगराईमुक्त ठेवण्यासाठी दर शनिवारी एका प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्पही नगरपरिषदेने केला आहे. अलिबाग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने शहराची स्वच्छता आणि सुसज्जता महत्त्वाची आहेच; मात्र, सुंदर अलिबागसोबत निरोगी अलिबाग घडविणेही तितकेच आवश्यक आहे, असे देखील ॲड. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version